महाराष्ट्र जागरण डेस्क: एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पाहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नावदेखील सामील झाले आहे.
एव्हाना बॉलीवूडमध्ये आपला चांगला जम बसवलेली एली ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. २०१३ मध्ये ‘मिकी व्हायरस’ या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीने आजवर ‘किस किस को प्यार करू’, ‘नाम शबाना’, ‘पोस्टर बॉईज’, ‘बाझार’, ‘मलंग’, ‘कोई जाने ना’, ‘गुडबाय’ या हिंदी चित्रपटांसोबतच तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीने खूप मेहनत घेतली आहे. आपल्याला अवगत नसलेल्या भाषेतील चित्रपटातील मुख्य भूमिका तिने मोठ्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने साकारल्याचे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवेल.
मराठीत एन्ट्री करण्याबाबत एली म्हणाली की, मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. स्वीडीश, हिंदी, तामिळ आणि कन्नड चित्रपटांनंतर ‘इलू इलू’च्या निमित्ताने मराठी भाषेची गोडी चाखण्याची संधी मिळाली आहे. यातील कॅरेक्टर माझ्या आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळं आहे. एका नव्या लूकमध्ये मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुरुवातीला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा थोडं दडपण जाणवलं होतं, पण पटकथा आणि कॅरेक्टर समजल्यावर मराठीत एंट्री करण्यासाठी हीच अचूक संधी असल्याची जाणीव झाल्याने होकार दिल्याचेही एली म्हणाली.


