Acne: चेहऱ्यावर येणारे फोड, पिंपल्स किंवा मुरमं ही समस्या फक्त तरुणाईतच मर्यादित नाही. अनेक प्रौढांनाही याचा त्रास होतो आणि तो त्वचेवरील सौंदर्य आणि आत्मविश्वासावर थेट परिणाम करतो. इंग्रजीत ‘Acne’ आणि ‘Pimples’ या शब्दांचा बर्याच वेळा एकसारखा अर्थ समजला जातो, पण प्रत्यक्षात दोन्ही वेगळ्या आहेत. ॲक्ने हा एक त्वचेचा विकार आहे ज्यामध्ये पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, सिस्ट, नोड्युल्स अशा विविध प्रकारच्या त्रासांचा समावेश होतो. तर पिंपल्स हा फक्त ॲक्नेचा एक भाग आहे. जेव्हा त्वचेवरील छिद्रांमध्ये जास्त तेल, घाण, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतो, तेव्हा लालसर, दुखणारे आणि पू भरलेले फोड तयार होतात, जे पिंपल्स म्हणून ओळखले जातात.
पिंपल्सवर घरगुती उपाय काय
आजकाल इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर पिंपल्स घालवण्यासाठी अनेक घरगुती उपाय सुचवले जातात. परंतु, चुकीच्या पद्धतींचा वापर केल्यास फोड वाढू शकतो, विशेषतः जर त्वचा संवेदनशील असेल तर त्रास अधिक होतो. त्यामुळे स्वतःहून उपाय करत राहण्यापेक्षा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच योग्य उपचार घेणे सुरक्षित आणि प्रभावी ठरते. अभिनेत्री तमन्ना भाटियाने या विषयावर काही काळापूर्वी चर्चेत बोलताना, पिंपल्सवर लाळ लावल्यास ते कमी होतात, असे म्हटले होते. तिने सांगितले की रात्रभर तोंडातील नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल घटकांमुळे पिंपल्स बरे होतात. तरीही या विधानावर अनेक प्रश्न उपस्थित झाले, परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पिंपल्स येण्यामागे बॅक्टेरिया, तेल आणि त्वचेवरील छिद्रांच्या अडथळ्यांचा मोठा वाटा असतो.
ॲक्ने म्हणजे नेमके काय?
त्वचेतील छिद्रांमध्ये जास्त तेल, मृत पेशी आणि बॅक्टेरिया जमा होणे हे ॲक्नेचे मूळ कारण आहे. हार्मोनल बदलांमुळे देखील तेलाचे प्रमाण वाढते आणि त्वचेमध्ये दाह निर्माण होतो. यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, नोड्युल्स आणि सिस्ट सारखे फोड तयार होतात. मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरिफा चौसे म्हणतात, “हार्मोनल बदल हे ॲक्नेची सर्वात मोठी कारणे आहेत. हे बदल तरुणाईत, मासिक पाळीच्या काळात, गर्भधारणेदरम्यान आणि तणावपूर्ण परिस्थितीत जास्त दिसतात. यामुळे तेलाचे प्रमाण वाढते आणि त्वचेवरील छिद्रं बंद होतात.”
कोणत्या वयोगटात त्रास जास्त होतो?
तारुण्यात हा त्रास जास्त दिसतो, पण प्रौढ वयातही, विशेषतः महिला वयाच्या 30-40 वर्षांत, पिंपल्सचे प्रमाण वाढू शकते. प्रदूषण, धूळ, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस या कारणांमुळे त्वचेचा दाह वाढतो आणि तेलाचे प्रमाण अधिक होते, ज्यामुळे त्वचा संवेदनशील होते.
त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला
डॉ. शरिफा सांगतात, “अक्नेवर आहार, तणाव, झोप यांचा प्रभाव मोठा असतो. जास्त साखर, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाल्याने दाह वाढतो. तणावामुळे शरीरात कार्टिसोल वाढते, ज्यामुळे पिंपल्स जास्त दिसतात. झोप अपुरी असल्यास त्वचेला पुनरुत्थान मिळत नाही. त्यामुळे संतुलित आहार, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली महत्वाची आहे.” त्वचेवरील छिद्रं स्वच्छ ठेवण्यासाठी सौम्य क्लिन्झरने दिवसातून दोनदा चेहरा धुणे आवश्यक आहे. तसेच, पिंपल्स ओढणे किंवा फोडणे टाळावे, कारण यामुळे इन्फेक्शन वाढू शकते आणि त्वचेला कायमचा हानी पोहोचू शकते.


