मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद गेल्या काही काळापासून आजारी आहे. सबा आझाद हिला सायक्लोस्पोरा कायटेनेन्सिस या आजाराचे निदान झाले. जेव्हा हा आजार समोर आला तेव्हापासून याचीच चर्चा सुरु आहे. या संसर्गामुळे रुग्ण शारीरिकदृष्ट्या अशक्त होतो. वजनही कमी होते.
सायक्लोस्पोरा कायटेनेन्सिस हा एक सूक्ष्म परजीवी आहे जो प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो. हा संसर्ग सामान्यतः आतड्यांवर परिणाम करतो आणि पचनसंस्थेला गंभीरपणे कमकुवत करू शकतो. हा आजार विशेषतः अशा ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो जिथे स्वच्छता आणि अन्न सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. सायक्लोस्पोरा कायटेनेन्सिसची अनेक लक्षणे आहेत. त्यात याची लक्षणे लगेच दिसत नाहीत, तर काही दिवसांनी दिसतात. सतत जुलाब, पोटदुखी आणि पोटात गोळे येणे, मळमळ आणि उलट्या, थकवा आणि अशक्तपणा यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे.
तसेच भूक न लागणे, वजन कमी होणे, सौम्य ताप, डिहायड्रेशन यांसारखी लक्षणे आहेत. हा संसर्ग टाळण्यासाठी, काही महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागते. त्यात नेहमी स्वच्छ, उकळलेले किंवा गाळलेले पाणी प्यावे. फळे आणि भाज्या पूर्णपणे धुतल्यानंतरच खाव्यात. अन्न व्यवस्थित शिजवून खावे. बाहेर जेवताना स्वच्छतेचे पालन करावे. वारंवार हात धुण्याची सवय लावा याने तुम्हाला अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते.


