Liquor Party at Raireshwar Fort: पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात दारू पार्टी करणाऱ्या तीन परप्रांतीय मद्यपींना शिवप्रेमींकडून चांगलाच चोप दिला गेला आहे. शिवाय, या मद्यपींना किल्ल्याच्या परिसरातून हाकलून लावण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या शिवप्रेमींना रस्त्याच्या कडेला दारू पित बसलेले तीन युवक दिसले. त्यांची चौकशी केली असता ते परप्रांतीय असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी त्यांना याबाबत जाब विचारला आणि त्यांच्या दारूच्या बाटल्या फोडल्या व त्यांना चोप देत तेथून हाकलले.
तर शिवप्रेमी नेमके कोण होते आणि मद्यपान करणारे परप्रांतीय युवक नेमके कुठले आहेत, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होवू लागला आहे व त्याची चर्चाही सुरू आहे.. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात अशाप्रकारे मद्य प्राशन करण्याचा प्रकार समोर आल्याने, शिवप्रेमीं आणि गडप्रेमींकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
यापूर्वी सुद्धा जिल्ह्यातील काही किल्ल्यांवर असे प्रकार समोर
पूणे जिल्ह्यात अनेक गडकिल्ले आहेत. त्यामुळे यापूर्वी सुद्धा अनेकवेळा याठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्या-त्या वेळी तेथील स्थानिक शिवप्रेमींनी अशा मद्यपींना चोप देत माफी मागण्यास भाग पाडले आहे. आता रायरेश्वर किल्ल्यावर सुद्धा हा प्रकार घडल्याने तेथील स्थानिकांनी मद्यपीला चोप दिला आहे. मार पडताच त्यांनी गडावरून पळ काढला.


