मुंबई: कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटकामुळे मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध प्रशासनाने राबवविलेल्या मोहिमेनंतर आणखी दोन खोकल्याच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचे आढळून आले आहे. रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या औषधांचा समावेश आहे. ही दोन्ही औषधे गुजरातमधील दोन उत्पादक कंपन्यांची आहेत.
या दोन्ही औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हे मर्यादेपेक्षा जास्त असल्याने ती औषधे भेसळयुक्त व दर्जाहीन असल्याचे मध्य प्रदेशकडून जाहीर करत यासंदर्भातील माहिती महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सुद्धा सतर्क झाले आहे.
प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात राज्यातील या उत्पादनाच्या वितरणाचा आढावा घेतला. मात्र राज्यामध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधाचे वितरण झाले नसल्याचे आढळले. नव्याने दोन औषधांमध्ये सापडलेल्या औषधांबाबत महाराष्ट्रातील किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक, रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी या औषधांची विक्री, वितरण किंवा वापर करू नये असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.


