Sandeep Naik: नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात गेलेले माजी आमदार संदीप नाईक पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. संदीप नाईक यांनी आज त्यांच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.
‘सागर’ बंगल्यावर खलबतं आणि घरवापसी
आज दुपारी साधारण १ वाजताच्या सुमारास संदीप नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर संदीप नाईक यांचा भाजप प्रवेश आता केवळ औपचारिकता उरली आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवल्यानंतर पाच महिन्यांनी संदीप नाईक पुन्हा ‘कमळ’ हाती घेणार आहेत.
बेलापूरमधील राजकीय समीकरणं बदलणार
संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे नवी मुंबईत विशेषतः बेलापूर विधानसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ होणार आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये आल्याने ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे राजकीय वर्चस्व अधिक भक्कम होईल. यापूर्वीच संदीप नाईक यांच्या समर्थक २८ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. आता नाईक स्वतः परतत असल्याने बेलापूरमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल.
पक्षांतर्गत नाराजीचे आव्हान
संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला असला तरी, भाजपमधील मंदा म्हात्रे गटात नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ज्यांनी विरोधात काम केले, त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्यावरून जुन्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे.


