BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीत राजकीय समीकरणे गुंतागुंतीची होत आहेत. अशातचं आता या लढतीत जैन समाज हा नवीन खेळाडू उतरला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि जैन समाज यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जैन समुदायाने थेट राजकारणात उडी घेतली आहे. मुंबईत आयोजित धर्मसभेदरम्यान जैनमुनी कैवल्यरत्न महाराज यांनी ‘शांतीदूत जनकल्याण पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा पक्ष आगामी BMC निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे. विशेष म्हणजे, या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘कबुतर’ असेल.
दरम्यान, मुंबईत कबुतरखान्यांवरील वाद गेल्या काही महिन्यांपासून तीव्र झाला आहे. शासनाने आरोग्याच्या कारणास्तव कबुतरखाने बंद करण्याचे पाऊल उचलले असताना, जैन समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, कबुतरांना धान्य देणे ही धार्मिक भावना आहे आणि ती थांबवणे म्हणजे त्यांच्या श्रद्धेवर आघात आहे. कैवल्यरत्न महाराज यांनी धर्मसभेत बोलताना जैन समाजाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, ‘जैन समाज हा शांततेचा मार्ग स्वीकारणारा, पण अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहणारा समाज आहे. आम्ही देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या समाजांपैकी एक आहोत, तरीही आमच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.’
हेही वाचा – एकनाथ शिंदेंचे विश्वासू शिलेदार मंगेश चिवटे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? मोठी जबाबदारी सोपवली
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही थेट उद्देशून वक्तव्य केले. ‘मुख्यमंत्री साहेब, आपल्या नेत्यांना आवरा,’ असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तथापि, धर्मसभेत जैनमुनींनी काही वादग्रस्त विधानेही केली, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी म्हटले की, कबुतरांच्या विष्ठेमुळे किडनीचे आजार बरे होतात आणि गृहकलह कमी होतो. इतकेच नव्हे, तर ‘मी डॉक्टरांना मूर्ख मानतो’, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केलं आहे. यामुळे सोशल मीडियावर आणि वैद्यकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा – भाजप मराठवाड्यात स्वबळावर निवडणूक लढणार? मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?
तथापी, त्यांनी असा दावा केला की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले, ते जैन मुनींच्या आशीर्वादामुळे. तसेच, मंगलप्रभात लोढा धर्मसभेला आले नाहीत, ही सरकारची मिलीभगत आहे, असे वक्तव्य करत त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. या नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेमुळे मुंबईच्या निवडणुकीतील समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. आधीच महायुतीत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला असताना, आता ‘शांतीदूत जनकल्याण पार्टी’ मैदानात उतरल्याने BMC निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी इतकेच नव्हे, तर जैन समाज विरुद्ध सरकार असे एक नवे समीकरण उदयास येऊ शकते.


