मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार असून, ठाकरे बंधूंसोबत कोणतीही आघाडी केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या भाई जगताप यांच्या या विधानाने पक्षाच्या आगामी रणनितीबाबत चर्चेला उधाण आले आहे. भाई जगताप म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे. आम्ही कोणासोबतही हातमिळवणी करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना देखील हीच भूमिका घेतली होती आणि तीच बाब मी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत रमेश चेन्निथला यांच्या समोर स्पष्ट केली होती.
भाई जगताप यांनी पुढे म्हटलं आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नव्हेत. अनेक काँग्रेस कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी झटत आहेत, त्यामुळे त्यांनाच संधी द्यायला हवी. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनीच ठरवावे, कोणासोबत लढायचे आणि कोणाविरुद्ध. मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढण्याच्या बाजूने आहेत.
हेही वाचा –ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
जगताप यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने कधीही मनसेसोबत जाण्याचा विचार केलेला नाही आणि उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबतही मतभेद कायम आहेत. मविआत आता दोन शिवसेना आहेत. त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेसने स्वबळावर लढावे, हेच योग्य, असे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि मीडिया सेल प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले की, चेन्निथला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मनसेसोबत आमचे मूलभूत मतभेद आहेत, यात काहीच शंका नाही. स्थानिक पातळीवरील नेत्यांशी चर्चा करूनच काँग्रेस हायकमांड अंतिम निर्णय घेईल.


