मुंबई: राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यात पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे.
दिवाळीपूर्वी मिळणार मदत –
मुख्यमंत्र्यांच्या मते, राज्यात सुमारे 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात 2115 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी पाणी असल्यामुळे योग्य असेसमेंट घेणे कठीण झाले आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण माहिती जमा होईल आणि त्यानंतर तातडीच्या मदतीसह विविध प्रकारच्या नुकसानासाठी सहाय्य दिले जाईल. यात पिकांवर होणारी हानी, विहिरी, घर आणि अन्य तातडीची मदत यांचा समावेश असेल. ही मदत शक्यतो दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होणार –
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओला दुष्काळ संदर्भातही महत्त्वाचे विधान केले. मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची संकल्पना नसली तरी, त्यावेळी दुष्काळामुळे मिळालेल्या सर्व सवलती या परिस्थितीतही लागू केल्या जातील. या निर्णयाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना पूर्वीसारखी सर्व सहाय्यता मिळेल, असे फडणवीस म्हणाले. तथापी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय शेतकरी, सामान्य नागरिक आणि आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
हेही वाचा – Maharashtra Flood: सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना DPDC च्या निधीतून पैसे देणार
याबरोबरच, मंत्रिमंडळाने कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वसामान्य लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देणारी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसीही मंजूर केली आहे. या पॉलिसीअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सरच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करणे आणि सेंटर व एल-3 सेंटरच्या माध्यमातून उपचारांची सोपी उपलब्धता सुनिश्चित करणे हा उद्देश आहे. यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अंतरावर जाण्याची आवश्यकता कमी होईल आणि उपचारांचा खर्चही कमी होईल.


