नवी दिल्ली: देशातील कचऱ्याच्या पुनर्वापरातून पाच लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह असंख्य रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नीती आयोगाने या क्षेत्रासाठी धोरण आखावे, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जर भारतातील घन आणि द्रव कचऱ्याचे उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर झाले तर तो 5 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करून देशात रोजगार वाढवता येऊ शकतो, असे गडकरी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट समिट’मध्ये सांगितले. त्याचा पर्यावरणालाही फायदा होणार आहे.
कचऱ्यापासून मोठा व्यवसाय कसा सुरू करता येईल, याचे उदाहरण गडकरी यांनी दिले. गेल्या नऊ वर्षांपासून मी माझ्या मतदारसंघातील प्रक्रिया केलेले शौचालयाचे पाणी विकत असून, त्यातून दरवर्षी ३०० कोटी रुपये मिळतात.
मथुरेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा उल्लेख
यावेळी गडकरी यांनी मथुरेत सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, मथुरेत कचऱ्यावर सेंद्रिय पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्यातून निघणाऱ्या गाळाचे बायो फ्लोक्युलेंटमध्ये रूपांतर होते. गडकरी म्हणाले की, पूर्वी हे घाणेरडे पाणी यमुना नदीत जात असे. त्याचा वापर आता इंडियन ऑईल रिफायनरी कडून केला जातो.
कचऱ्याचा योग्य वापर केल्यास त्याचे संपत्तीत रूपांतर होऊ शकते. यामुळे रोजगाराच्या संधी वाढू शकतात. इतकंच नाही तर पर्यावरणाचा प्रश्नही सुटू शकतो. प्लॅस्टिकचा वापर इंधन तयार करण्यासाठी, सांडपाण्याचे औद्योगिक पाण्यात रूपांतर करण्यासाठी आणि कचऱ्याचा वापर करून विकता येतील अशा वस्तू तयार करता येतील, असेही ते म्हणाले.
स्वच्छ ऊर्जेवर भर द्या
वीजनिर्मितीत बायोमासच्या वापराबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, औष्णिक प्रकल्प पारंपारिकपणे कोळशाचा वापर करीत आहेत, परंतु एनटीपीसी आणि महाराष्ट्र सरकारने बायोमास वापरण्यास सुरवात केली आहे, ज्याला पांढरा कोळसा देखील म्हणतात. त्याची किंमत प्रति युनिट ७ रुपये आहे, पण कोळशापेक्षा स्वच्छ आहे.


