Sharad Pawar: राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील ज्वलंत मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. बारामती पोटनिवडणूक, अजित पवारांचा विमान अपघात आणि नाशिकचे खरात प्रकरण यावर पवारांनी सविस्तर भाष्य करत महायुती आणि विरोधकांना महत्त्वाचे संकेत दिले आहेत. “सुनेत्रा पवार यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही,” असे सांगत त्यांनी आपली राजकीय भूमिका अधोरेखित केली.
“निवडणूक लढवणे हा काँग्रेसचा अधिकार”
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, “लोकशाहीत निवडणूक लढवणे हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकार आहे. काँग्रेसने उमेदवार देणे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे.” अजितदादांच्या निधनानंतर कुटुंबप्रमुख म्हणून कोणालाही उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय घेतल्याचे सांगतानाच, “लोकशाहीत समोर कोणीतरी लढणार हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते,” असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवारांचा विमान अपघात: रोहित पवारांच्या आरोपांवर सावध प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत केलेल्या घातपाताच्या आरोपांवर शरद पवारांनी सावध पण सूचक भाष्य केले. “माझ्या प्राथमिक अंदाजानुसार तो एक अपघात असावा. घटनेच्या तासाभरात मी स्वतः त्याच विमानतळावर उतरलो होतो. मात्र, रोहित पवार यांनी काही अभ्यास करून CBI चौकशीची मागणी केली असेल, तर त्याबद्दल सरकारनेच स्पष्टीकरण दिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
‘खरात’ प्रकरणावरून सरकारला टोला; भोंदूगिरीवर ओढले ताशेरे
भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याभोवती फिरणाऱ्या राजकीय वर्तुळावर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “एकीकडे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे अशा भोंदू बाबांच्या दारी जायचे, हे महाराष्ट्रासाठी बरोबर नाही. राज्यात सध्या ‘बाबां’ची मोठी गर्दी झाली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. या प्रकरणात लोकप्रतिनिधींची नावे येणे ही राज्यासाठी चिंताजनक परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्ष हायजॅकचा आरोप आणि अंतर्गत वाद
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “त्यांनी त्यांच्या पक्षाबाबत काय निष्कर्ष काढला हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्यात कधीही विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती. सहकाऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.


