Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते, त्यांना आता तीन महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये मिळणार आहेत. महिला व बालविकास विभागाने यासंदर्भातील माहिती दिली असून, प्रलंबित निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नेमका निर्णय काय?
अनेक महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पैसे मिळाले नव्हते. यामुळे महिलांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण होते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणाला किती लाभ मिळणार?
दरम्यान, ज्या महिलांचे नोव्हेंबरपासूनचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे जमा झाले नव्हते, अशा पात्र महिलांच्या खात्यात एकत्रित ४५०० रुपये जमा होतील. तथापी, ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत, त्यांना केवळ जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळेल.
अर्जांची पडताळणी आणि चौकशी
काही ठिकाणी महिलांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला व बालविकास विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे तसेच अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. चुकीच्या पद्धतीने भरलेले अर्ज बाजूला काढून, पात्र लाभार्थी महिलांना तातडीने लाभ देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
हप्ता २१०० रुपये होणार?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री उदय सामंत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याचे संकेत दिले आहेत. लवकरच या वाढीव रकमेबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) येण्याची शक्यता असून, तसे झाल्यास महिलांच्या आर्थिक मदतीत मोठी वाढ होणार आहे.


