Mohol Election: गेल्या तीन दशकांपासून मोहोळ म्हणजे राजन पाटील असे असलेले राजकीय समीकरण आता पूर्णपणे कोलमडले आहे. विधानसभा निवडणुकीतील धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेच्या अवघ्या २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी दिग्गज पाटील गटाला धूळ चारत नगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला असून, या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
एका वर्षात दोन मोठे धक्के
राजन पाटील यांच्या बालेकिल्ल्याला लागलेले हे भगदाड अपघाती नसून विरोधकांच्या नियोजनबद्ध रणनीतीचा परिणाम मानला जात आहे. १९९५ पासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या पाटील गटाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पहिला मोठा झटका बसला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी त्यांना नाकारले आहे.
२२ वर्षांच्या पोरीने केला ‘करिश्मा’
वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या सिद्धी वस्त्रे यांच्या उमेदवारीची सुरुवातीला चेष्टा करण्यात आली होती. ही नवखी मुलगी काय करणार? अशी टीका पाटील गटाकडून झाली. मात्र, सिद्धीने १७० मतांच्या फरकाने भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत टीकाकारांना चोख उत्तर दिले. हा विजय म्हणजे माझ्या वयावर टीका करणाऱ्यांना जनतेने दिलेले उत्तर आहे, अशा शब्दांत सिद्धीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा –इंदापूर नगरपरिषदेत अटीतटीची लढत! अजित पवार गटाच्या भरत शहा विजयी, प्रदीप गारटकर यांचा पराभव
विरोधकांची ‘अनोखी’ एकजूट आणि शिंदेंचा इशारा
सिद्धी वस्त्रे यांच्या विजयामागे मोहोळमधील तीन प्रमुख नेत्यांची ताकद होती: १. राजू खरे: शरद पवार गटाचे विद्यमान आमदार. २. उमेष पाटील: अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष. ३. रमेश बारस्कर: शिवसेनेचे नेते. या तिघांनी पक्षीय भिंती ओलांडून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाखाली आपले बळ एकवटले. प्रचारादरम्यान खुद्द एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेतून राजन पाटील यांना जुन्या फाईल्स ओपन करण्याचा इशारा दिला होता.
हेही वाचा – Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! आमदारकी बचावली, शिक्षेलाही मिळाली स्थगिती
पाटील गटासाठी पुढील वाटचाल खडतर
अनगर नगरपंचायतीत उमेदवारी अर्जावरून झालेला वाद आणि त्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी केलेले गंभीर आरोप यामुळे पाटील कुटुंबाची प्रतिमा आधीच मलीन झाली होती. आता आपल्याच ‘होम ग्राउंड’वर पराभव स्वीकारावा लागल्याने, भाजपमध्ये नवीन प्रवेश केलेल्या राजन पाटील यांच्यासाठी आगामी राजकीय काळ अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.


