Pune Metro: पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो जाळ्याचा विस्तार आता युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या शहरात दोन मार्गांवर मेट्रो धावत असली तरी, लवकरच तिसरी मार्गिका म्हणजेच ‘मेट्रो लाईन ३’ पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३.३ किमीचा महत्त्वपूर्ण मार्ग ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आयटी हब थेट शहराशी जोडले जाणार
हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो लाईन वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही नवीन मार्गिका ‘सिव्हिल कोर्ट’ स्थानकावर सध्याच्या लाईन १ आणि २ ला स्कायवॉकद्वारे जोडली जाईल. या ‘कनेक्टिव्हिटी’मुळे प्रवाशांना संपूर्ण शहरात कोठेही जाणे सुलभ होईल आणि मेट्रोच्या प्रवासी संख्येतही मोठी वाढ होईल.
हेही वाचा – लग्नापूर्वीचं जोडप्याने स्टेशनवर केलं ‘असं’ काम की, पुणे मेट्रोने ठोठावला दंड
केंद्राची मंजुरी
पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत:
पिंपरी-चिंचवड ते निगडी: या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सप्टेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
खराडी ते खडकवासला: या विस्तारालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे शहराच्या पूर्व-पश्चिम भागांना मोठी जोडणी मिळेल.
रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक: या दोन महत्त्वाच्या मार्गांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तथापी, स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक कारणांमुळे सध्या रखडले असले तरी, इतर मार्गांच्या कामांना गती देण्यात आली आहे.


