Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये आता मोठी प्रशासकीय स्वच्छता करण्यात आली आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली ३१ डिसेंबर २०२५ ची मुदत संपली असून, वेळेत प्रक्रिया न केल्यामुळे राज्यातील तब्बल ६७ लाख महिला आता या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. या महिलांची नावे लाभार्थी यादीतून अधिकृतपणे वगळण्यात आली आहेत.
केवळ केवायसीच नाही, तर ‘अपात्रता’ ही ठरली कारण
योजनेतून नाव वगळले गेलेल्या ६७ लाख महिला केवळ तांत्रिक कारणास्तव बाहेर पडलेल्या नाहीत, तर त्यात अनेक अपात्र लाभार्थ्यांचाही समावेश आहे. अनेक महिलांकडे स्वतःचे वाहन असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. काही लाभार्थी महिला स्वतः शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे आढळले असून, त्यांनी निकषांचे उल्लंघन केले आहे. अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिलांनीही या योजनेत नोंदणी केली होती.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील महिलांना लखपती बनवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
१ कोटी ८० लाख महिलांना लाभ सुरूच राहणार
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण पात्र महिलांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ३१ डिसेंबरपर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ज्या महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना योजनेचे हप्ते विनाव्यत्यय मिळत राहतील.
आदिती तटकरे यांचे संकेत आणि कठोर पावले
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, केवायसीसाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. सरकारने या योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी ही ‘चाळणी’ लावली आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळल्यामुळे आता केवळ गरजू आणि निकषात बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणे सुनिश्चित झाले आहे.


