Ladki Bahin Yojana: राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींना यंदा वर्षाअखेरीस मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात सरकार दोन महिन्यांचा एकत्रित सन्माननिधी जारी करू शकत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बहिणींना नियमित 1500 रुपयांच्या ऐवजी तब्बल 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नोव्हेंबरचा हप्ता प्रलंबित
डिसेंबरची सुरुवात झाली तरीही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता वाढत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या अहवालांनुसार, यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्र पाठवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. अशी व्यवस्था केली गेल्यास लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील महिलांना लखपती बनवणार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
या विलंबामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कारणीभूत असाव्यात, असे बोलले जात आहे. यापूर्वीही निवडणुकीच्या काळात असेच घडले होते. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यानही लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा निधी एकत्र जमा करण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात दोन्ही हप्ते जमा होण्याची दाट शक्यता आहे. तरीही, अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
E-KYC न केल्यास मिळणार नाही लाभ
सरकारने गैरव्यवहार टाळण्यासाठी ई-KYC अनिवार्य केली आहे. अनेक लाभार्थींनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांचा निधी थांबू शकतो. घरबसल्या ई-KYC करण्याची सोपी पद्धत खाली दिली आहे.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती! लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठी घोषणा; नेमकं काय म्हणाले?
घरी बसून करा E-KYC
- ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- होमपेजवर दिसणाऱ्या E-KYC पर्यायावर क्लिक करा.
- उघडणाऱ्या फॉर्ममध्ये आधार क्रमांक व कॅप्चा भरा.
- आधार प्रमाणीकरणासाठी सहमती देऊन OTP मागवा.
- मोबाईलवर आलेला OTP टाइप करून सबमिट करा.
- ई-KYC आधी झालेली असल्यास तशी सूचना मिळेल; न झाल्यास लाभार्थी यादीत आपले नाव तपासा.
राज्य सरकारने जून 2024 मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली. महिलांना मासिक आर्थिक मदत देऊन त्यांच्या स्वावलंबनाला चालना देणे हा योजनेचा मुख्य उद्देश. पात्र लाभार्थींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातात.


