बीड : मस्साजोग येथील अवादा एनर्जी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यात सीआयडी कोठडीत असलेला आरोपी विष्णू चाटे याने सीआयडी चौकशीत वाल्मिक कराड याला फोन लावून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले होते, अशी कबुली दिली आहे. सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या पीसीआर मागणी अहवालातून हा खुलासा झाला आहे.
मस्साजोग येथील पवनचक्की अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात विष्णू चाटे सध्या सीआयडी कोठडीत आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड़ची पीसीआरसाठीची मागणी करण्यात आली होती, त्या अहवालानुसार, विष्णू साठे याने वाल्मिक कराड याला फोन लावून पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले होते, असे म्हटले आहे. आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होता, मात्र पक्षातून त्याचे निलंबन करण्यात आलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाटे यास बीडजवळ पकडले होते. तो सध्या सीआयडी कोठडीत आहे.


