मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जागावाटप अखेर ठरले आहे. एकूण २२७ जागांपैकी भाजप १३७ जागांवर, तर शिंदे सेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीचे इतर घटक पक्ष याच आकड्यात समाविष्ट केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती जाहीर केली आणि मुंबईकरांच्या विश्वासावर भर दिला.
फडणवीस यांनी पोस्टमध्ये लिहिले, “भाजप आणि शिवसेना महायुतीचे मुंबईतील जागावाटप पूर्ण झाले असून १३७ जागा भाजप तर ९० जागा शिवसेना लढवणार आहे. महायुतीचे इतर घटकपक्ष यात समाविष्ट असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी विकासाची कामे कुणी केली, हे मुंबईकरांना चांगलेच ठावूक आहे. त्यामुळेच मुंबईकर महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि प्रचंड बहुमताने महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, हा आम्हाला विश्वास आहे.”
पोस्ट केलेल्या व्हिडिओत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणतात, “मुंबईत भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीच्या इतर घटक पक्षांना या आकड्यांमध्ये समाविष्ट केले जाईल. भाजप-शिवसेना एकत्रितपणे प्रचाराला सुरुवात करणार आहे. मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा, महायुतीचा भगवा झेंडा आम्ही फडकवणार आहोत. मुंबईकरांचा महापौर हा मुंबई महापालिकेत विराजमान झाला पाहिजे. ज्यामुळे मुंबईचा विकास आणि शहराची सुरक्षितता अबाधित राहील.”
साटम यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर थेट टीका करत म्हटले, “मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहिजे. आता एक नवीन मामुंची टोळी या मुंबई शहराचा ताबा घेण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना घरी पाठवण्याचं काम महायुती करणार आहे.”
नामांकन अर्ज भरण्याचा आज (३० डिसेंबर) शेवटचा दिवस असून, महायुतीचे सर्व उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी आहे. या जागावाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीला कडवी टक्कर मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. महायुती आता संयुक्त प्रचाराला सुरुवात करणार आहे.


