BJP Candidates List : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या 6 जागांसाठी राज्यातून तब्बल 30 जणांची यादी पाठवण्यात आल्यानंतर ती कमी करून सुधारित यादी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानुसार, महाराष्ट्र भाजपने आता जवळपास अर्धी नावे कमी करत 14 जणांची नवी यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे मूळ यादीतील कोणाचे पत्ते कट झाले आणि नव्या यादीत कोणाला स्थान मिळाले, याबाबत पक्षात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
12 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात लॉबिंगला वेग आला आहे. अंतिम यादीतून नाव वगळल्या जाणाऱ्यांमध्ये नाराजी उसळण्याची शक्यता लक्षात घेता भाजप सावध पवित्रा घेत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी पक्षातील जुने आणि तळागाळातील कार्यकर्त्यांनाही संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे अखेर कोणाच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


