Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३००० महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र काँग्रेसने या योजनेच्या हप्त्यावर आक्षेप घेत राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवल्यानंतर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
काँग्रेसने आपल्या पत्रात लाडकी बहीण योजनेला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, महापालिका निवडणुकीनंतरच हप्ता वितरित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता.
या संपूर्ण वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत संभ्रमावर पूर्णविराम दिला आहे.
ते म्हणाले, “काँग्रेस आणि विरोधक सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजनेला विरोध करत आहेत. योजना सुरू झाली तेव्हा ती बंद करण्याची मागणी करण्यात आली होती, न्यायालयातही गेले होते. आता महिलांना पैसे देऊ नका, असं म्हणत आहेत.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना ही आधीपासून सुरू असलेली योजना आहे. आचारसंहितेनुसार सुरू असलेली योजना थांबवता येत नाही. त्यामुळे कोणी कितीही पत्र लिहिली तरी ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच.”
मुख्यमंत्र्यांच्या या ठाम भूमिकेमुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून मकरसंक्रांतीच्या आसपास महिलांच्या खात्यात ३००० जमा होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच हा हप्ता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


