Pune News: पुणे शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली असून, आजही समाजात प्रामाणिकता आणि माणुसकी जिवंत असल्याचे सुंदर उदाहरण समोर आले आहे. सदाशिव पेठ भागात कचरा गोळा करणाऱ्या अंजू माने यांनी रस्त्यावर पडलेली दहा लाख रुपयांची बॅग मूळ मालकापर्यंत पोहोचवत सर्वांची मने जिंकली.
कर्तव्यावर असतानाच सापडली बॅग
सकाळी नेहमीप्रमाणे घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी अंजू माने या जात होत्या. फीडर पॉइंटकडे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. आधीही औषधांच्या बॅगा परिसरात सापडल्या असल्याने त्यांनी ती बॅग उचलून सुरक्षित ठेवली. मात्र, बॅग उघडताच आत औषधांबरोबरच दहा लाख रुपयांची रोख रक्कम पाहून त्या थोड्या वेळासाठी थबकल्या.
20 वर्षांचा अनुभव आणि प्रामाणिकता
या भागात तब्बल दोन दशके सेवा देत असलेल्या अंजू ताईंनी घाबरण्याऐवजी तातडीने मालक शोधण्याचे ठरवले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने चौकशी सुरू झाली. त्याचदरम्यान एक व्यक्ती अत्यंत बेचैन अवस्थेत काहीतरी शोधत फिरताना दिसला. अंजू ताईंनी त्याला जवळ बोलावून शांत केले आणि बॅग त्याचीच असल्याची खात्री होताच दहा लाख रुपये ताब्यात दिले.
हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
अंजू ताईंसाठी कौतुकाचा वर्षाव
बॅग परत मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने आणि आसपासच्या नागरिकांनी अंजू माने यांच्या प्रामाणिकतेचे मनापासून कौतुक केले. परिसरातील रहिवाशांनी त्यांचा साडी आणि रोख स्वरूपात सत्कार केला. त्यांच्या हातून बॅग सुरक्षित हातात पोहोचली हे पाहून नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. “हे पैसे माझे नव्हते. योग्य ठिकाणी पोहोचवणं हे माझं कर्तव्यच होतं,” असे अंजू ताईंनी नम्रपणे म्हटले.
ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड
या प्रसंगाने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, गेल्या वीस वर्षांत स्वच्छ संस्थेतील कचरा वेचकांनी पुणेकरांमध्ये एक अनोखा विश्वास निर्माण केला आहे. ४० लाख नागरिकांना सेवा देणाऱ्या ४००० स्वच्छ कर्मचाऱ्यांमध्ये अशीच निष्ठा आणि पारदर्शकता दिसते. या प्रेरणादायी कृतीची दखल घेत आमदार हेमंत रासने यांनी स्वतः अंजू माने यांचा सन्मान केला. त्यांना पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले आणि भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर, “स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा” या मोहिमेत नवीन ऊर्जा भरत अंजू माने यांची ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि प्रामाणिक कसबा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून निवड जाहीर करण्यात आली.


