Pune Porsche Accident: पुण्यात गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल अगरवाल याला पुन्हा एकदा न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. मागील सुमारे 17 महिन्यांपासून विशाल अगरवाल तुरुंगात असून, या प्रकरणात त्याच्यावर गंभीर आरोप कायम आहेत. कल्याणीनगर येथील अपघातानंतर अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी वैद्यकीय अहवालात फेरफार केल्याचा ठपका विशाल अगरवाल याच्यावर ठेवण्यात आला आहे. मद्यप्राशन केल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्याचा कट रचण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
डॉक्टर अजय तावरे यांचा जामीन अर्जही फेटाळला –
या प्रकरणात सहभागी असलेल्या डॉक्टरांनाही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अल्पवयीन आरोपीचे रक्तनमुने बदलल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरे यांचा जामीन अर्जदेखील फेटाळण्यात आला आहे.
हेही वाचा – Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई! 2 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ
अपघात आणि अटकेची पार्श्वभूमी
दरम्यान, 19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात धावणाऱ्या पोर्शे कारने दुचाकीस्वार दोन तरुणांना धडक दिली होती. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी वाहन चालवणारा तरुण अवघ्या 17 वर्षे 8 महिन्यांचा असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले होते. कारचालक अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. मात्र, मद्यप्राशनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी विशाल अगरवालने वैद्यकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप झाल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
पोलीस निरीक्षकावरही कारवाई
यानंतर 21 मे 2024 रोजी पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. या प्रकरणात तपासादरम्यान काही पोलिस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला अप्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अपघात प्रकरणातील निष्काळजीपणा आणि गैरवर्तनामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली.


