पुणे : पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या ३.५ एकर जमिनीच्या वादग्रस्त विक्री व्यवहाराला अखेर पूर्णविराम लागला आहे. गोखले कन्स्ट्रक्शन्सचे मालक विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत ई-मेलद्वारे ट्रस्टला कळवले आहे.
गोखले यांनी नैतिक कारणांमुळे आणि जैन समाजाच्या भावना दुखावण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या करारानुसार ट्रस्टने गोखले कन्स्ट्रक्शन्सला ही जमीन ३११ कोटी रुपयांना विकली होती, ज्यात जैन मंदिर, हॉस्टेल आणि इतर सुविधा होत्या. या व्यवहाराला जैन समाज, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून तीव्र विरोध होता, जो ट्रस्टच्या दानधर्माच्या उद्देशाला धक्का लावणारा असल्याचे सांगितले जात होते.
नेमकं प्रकरण काय?
सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (SHNT) च्या या जमिनीचा व्यवहार डिसेंबर २०२४ मध्ये झाला होता. यामध्ये गोखले कन्स्ट्रक्शन्सने १६ लाख चौरस फूट अल्ट्रा-प्रिमियम रेसिडेन्शिअल आणि रिटेल स्पेस विकसित करण्याची योजना आखली होती. या प्रकल्पाची अपेक्षित कमाई २,५०० कोटी रुपयांची होती. मात्र, जैन समाजाने या विक्रीला ‘ट्रस्टच्या मूलभूत उद्देशाचे उल्लंघन’ म्हणून विरोध केला.
यात जैन मंदिर आणि हॉस्टेलसारख्या सुविधांचे रक्षण न करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी या व्यवहारावर ‘स्टेटस क्वो’ आदेश जारी करून तपासाची घोषणा केली होती. यात जैन मंदिराची अस्तित्व, त्याचे क्षेत्रफळ आणि पुनर्विकासादरम्यान ते हटवण्याची गरज यांचा अभ्यास करण्यात येणार होता.
गोखले यांचे स्पष्टीकरण
विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये सांगितले की, “आमचा जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू कधीच नव्हता. नैतिक कारणांमुळे आणि सामाजिक दबावामुळे हा निर्णय घेतला आहे.” या निर्णयामुळे जैन समाजात समाधान व्यक्त केले जात असले तरी, ट्रस्टच्या ट्रस्टींवर बेकायदेशीर विक्रीचा आरोप कायम आहे. धर्मादाय आयुक्तांच्या तपासाचा अहवाल येणे बाकी असल्याने, भविष्यात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.
जैन मुनींचे आंदोलन, पोलिसांनी परवानगी नाकारली
दुसरीकडे, मुंबईत जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी कबुतरखान्यांवरील बंदी, जैन मंदिरांचे रक्षण आणि गोरक्षणाच्या मुद्द्यावर १ नोव्हेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. कारण म्हणजे, हा दिवस सुट्टीचा असून, मनसेचा नियोजित मोर्चाही त्याच ठिकाणी आहे. यानंतर मुनी निलेश चंद्र विजय यांनी उपोषण ३ नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सोमवार असल्याने जैन समाजाकडून प्रतिसाद मिळेल का, याबाबत शंका उपस्थित होत आहे.


