Ravi Landge Threat Call: पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची एक धक्कादायक धमकी देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, धमकी देणाऱ्या व्यक्तीने महापौरांना थेट फोन न करता, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ‘समाधान हेल्पलाईन’वर कॉल करून “मी रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे,” असे उघड आव्हान पोलिसांना दिले. या फोन कॉलनंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आणि पोलिसांनी काही तासांतच आरोपीचा माग काढला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, कौटुंबिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
कोण आहे धमकी देणारा तरुण?
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याचे नाव आशिष जामदाडे पाटील असल्याचे स्पष्ट झाले. हा तरुण मूळचा अहमदनगरचा रहिवासी असून सध्या चिखली भागात राहतो. तो भोसरी एमआयडीसी (MIDC) मध्ये सुरक्षा रक्षक (Security Guard) म्हणून नोकरी करतो. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले की, आशिषचा घटस्फोट झाला असून तो आपल्या आई-वडिलांपासूनही वेगळा राहतो. या तीव्र कौटुंबिक वादामुळे आणि मानसिक तणावामुळे त्याची मनःस्थिती खालावली होती, ज्यातूनच त्याने पोलिसांना फोन करून हे बेजबाबदार पाऊल उचलले.
“आधी दोन वेळा घरी आलेला, पुस्तकही भेट दिलं होतं…” – महापौर रवी लांडगे
या प्रकरणावर बोलताना महापौर रवी लांडगे यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले. पोलिसांनी संशयिताचा फोटो दाखवल्यानंतर महापौरांनी त्याला तात्काळ ओळखले. महापौर म्हणाले, “साधारण दोन वर्षांपूर्वी हा तरुण क्रीडा क्षेत्रातील काही कामा संदर्भात मला दोन वेळा घरी येऊन भेटला होता. माझ्या आजीच्या निधनानंतर झालेल्या तेराव्याच्या विधीलाही तो उपस्थित होता. त्या वेळी त्याने मला एक पुस्तकही भेट दिले होते. आमच्यात अतिशय चांगला संवाद झाला होता, त्यामुळे त्याने अचानक असे का केले, याचे मला मोठे आश्चर्य वाटत आहे.”
पोलिसांनी दिली कडक ताकीद
महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले की, संबंधित तरुणाने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक फोन करून कोणतीही धमकी दिलेली नव्हती. त्याने थेट पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला होता. भोसरी पोलिसांनी आशिषची पार्श्वभूमी आणि त्याची मानसिक स्थिती विचारात घेऊन, त्याला व त्याच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक समज दिली आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.


