Pune Traffic Update : १ जानेवारी २०२६ रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी पुण्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी ३१ डिसेंबर २०२५ (दुपारी २ वाजेपासून) ते १ जानेवारी २०२६ (मध्यरात्रीपर्यंत) वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक बदलांचे मुख्य कारण
राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी या बदलांची घोषणा केली आहे. नगर रस्ता आणि परिसरातील सर्व महत्त्वाचे मार्ग या काळात डायव्हर्ट (वळवण्यात) करण्यात आले आहेत.
हेही वाचा – पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेस-उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार?
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग (Route Guide)
जर तुम्ही या दोन दिवसात पुण्यातून प्रवास करणार असाल, तर खालील पर्यायी मार्गांचा वापर करा:
- पुणे ते नगर प्रवास: पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपासमार्गे मुंडवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर हायवे, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर या मार्गाने पुढे जातील.
- मुंबई ते नगर (अवजड वाहने): मुंबईहून येणाऱ्या अवजड वाहनांना वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा मार्गे वळवण्यात आले आहे.
- मुंबई ते नगर (हलकी वाहने): कार किंवा इतर हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे जाऊ शकतात.
- दक्षिण महाराष्ट्र ते नगर: कोल्हापूर, सातारा किंवा सांगलीकडून येणाऱ्या वाहनांनी हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरच्या दिशेने प्रवास करावा.
- सोलापूर ते आळंदी/चाकण: ही वाहने हडपसर, मगरपट्टा आणि विश्रांतवाडी मार्गे जातील.
अवजड वाहनांसाठी ‘नो एन्ट्री’
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरपासून शहरातील खालील प्रमुख नाक्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे:
- खडकी (हॅरिस ब्रिज)
- बाणेर (राधा चौक)
- सिंहगड रस्ता (नवले पूल)
- कात्रज चौक आणि कोंढवा (खाडी मशीन चौक)
- लोणी काळभोर (थेऊर फाटा) आणि मांतरवाडी फाटा
आळंदी-तुळापूर हा पूल इंद्रायणी नदीवरील अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील. केवळ भाविकांच्या हलक्या वाहनांना येथून प्रवेश दिला जाईल. तथापी, विश्रांतवाडी आणि लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी अवजड वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी शक्यतो नगर रस्त्याचा वापर टाळावा आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


