Indapur Depot: प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन इंदापूर आगाराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून इंदापूर-कोल्हापूर ही बसफेरी आता आदमापूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपासून ही विस्तारित बससेवा नियमित स्वरूपात सुरू करण्यात आली असून त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. संत बाळुमामा यांच्या दर्शनासाठी आदमापूरकडे जाणाऱ्या भाविकांना आता थेट बससेवेचा लाभ मिळणार आहे. यामुळे प्रवासातील वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार असून नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा –Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी
ही बस इंदापूर येथून सकाळी 11.45 वाजता सुटून जंक्शन, नातेपुते, शिंगणापूर, दहीवडी, वडूज, पुसेसावली, कराड आणि कोल्हापूर असा मार्ग पार करत सायंकाळी 7.40 वाजता आदमापूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात हीच बस आदमापूरहून सकाळी 5.30 वाजता निघून दुपारी 1.25 वाजता इंदापूरला दाखल होईल.
दररोज चालणाऱ्या या बसफेरीसह पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून या सेवेचा विशेष प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत डेपो मॅनेजर वैभव गोसावी व स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे, अशी माहिती नियंत्रक विक्रम चंदनशिवे यांनी दिली.


