Pune Dog Attack: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा एक अत्यंत भीषण चेहरा समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात एका तरुणावर ८-१० कुत्र्यांच्या टोळक्याने अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तरुणाला १० फूट फरफटत नेऊन त्याच्या शरीराचे लचके तोडले आहेत. अक्षय प्रकाश चव्हाण (रा. धायरी) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, सध्या तो मृत्यूशी झुंज देत आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, अक्षय चव्हाण हा बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास नऱ्हे-वडगाव रस्त्यावरील एका वाइन शॉपजवळ होता. अक्षयने मद्यप्राशन केले असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर कोसळला. तो जमिनीवर पडताच परिसरातील सात ते आठ हिंस्र भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. अक्षय नशेत असल्यामुळे त्याला कुत्र्यांचा प्रतिकार करता आला नाही. कुत्र्यांनी त्याला १० फुटांपर्यंत ओढत नेले आणि त्याच्या कान, नाक व शरीराच्या इतर भागांचे अक्षरशः लचके तोडले.
संवेदनशून्यतेचा कळस
पहाटे अडीच वाजता झालेला हा हल्ला इतका भीषण होता की अक्षय रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच बेशुद्ध पडला. धक्कादायक म्हणजे, पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत तो तिथेच पडून होता, अनेक नागरिक तिथून गेले मात्र कोणीही मदतीसाठी हात पुढे केला नाही.
स्वच्छता कामगारांमुळे वाचले प्राण
सकाळी नऊच्या सुमारास परिसरातील स्वच्छता कामगारांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. सध्या अक्षयवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ नसबंदी करून हा प्रश्न सुटणारा नाही, तर आक्रमक कुत्र्यांपासून नागरिकांचे संरक्षण कोण करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


