Utkarsh Competition 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे नुकत्याच पार पडलेल्या १६ व्या राज्यस्तरीय सामाजिक-सांस्कृतिक ‘उत्कर्ष’ स्पर्धेत इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी सरदार अब्दुल मुलाणी याने लोककला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
पुणे विद्यापीठाच्या संघातून सहभाग
ही स्पर्धा ४ ते ७ जानेवारी या कालावधीत सोलापूर विद्यापीठात पार पडली. सरदार मुलाणी याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चमूतून या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपली कला सादर केली होती.
हेही वाचा – Sanskar Khilare: इंदापूरच्या लेकाची राष्ट्रीय स्तरावर गवसणी! तिरंदाजीत संस्कार खिलारेला रौप्य पदक
सादरीकरणाचे परीक्षकांकडून कौतुक
सरदार मुलाणी याने सादर केलेल्या लोककलेमध्ये महाराष्ट्राचा पारंपरिक सांस्कृतिक वारसा, नृत्य आणि अभिनयातील शिस्तबद्धता दिसून आली. त्याच्या सादरीकरणातील सहजता आणि प्रभावी शैलीमुळे परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले. त्याच्या या यशामुळे इंदापूर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
सरदार मुलाणीच्या या यशाबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उप-प्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे आणि सर्व प्राध्यापक वृंदाने त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


