पिंपरी: गुलियन बॅरी सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून पालिका अॅक्शन मोडवर आली आहे. शहरातील दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या अशा १० आरओ प्लांटवर महापालिकेने कारवाई केली असून संबंधित चालकांना प्लांट तत्काळ बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर यांनी दिली.
गुलियन बॅरी सिंड्रोम (जबीएस) प्रादूर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खासगी आरो वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करुन पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उपड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते. नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी सध्या शहरात दूषित पिण्याचा पुरवठा करणाऱ्या अनधिकृत वॉटर बॉटलिंग आणि आरओ प्लांट्सवर तत्काळ कारवाई केली जात आहे.
….. असे आहे कारवाईचे स्वरूप
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्लंबर यांच्या समन्वयाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय या प्लांट्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये फ क्षेत्रीय कार्यालय २, ड क्षेत्रीय कार्यालय २ आरओ प्लांट, तर ७ एटीएम आरओ प्लांट, ब क्षेत्रीय कार्यालय १, ग क्षेत्रीय कार्यालय ४ आणि ह क्षेत्रीय कार्यालय १ आरओ प्लांटचा समावेश आहे.


