पुणे: देवघरात लावलेल्या दिव्याने पडदा पेटून घराला लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी (दि. ९) सायंकाळी कोंढवा परिसरात घडला. वृंदा संगवार (वय ६५, रा. शनश्री सुवर्णयुग सोसायटी, कोंढवा खुर्द) हे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या आगीमध्ये मनोज बोरकर (वय ७५) गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना उपचारासाठी कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराची कोंढवा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
संगवार यांच्या घराला सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार अग्निशामक दलाला कळवला. त्यानुसार अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संपूर्ण फ्लॅटला आगीने वेढले. अग्निशामक दलाचे अधिकारी समीर शेख व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये फ्लॅटमधील काही व्यक्ती अडकल्या असल्याचे लक्षात आल्यावर अग्निशामक दलाच्या पथकाने अग्निरोधक पोशाख परिधान करून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. त्यांनी या घटनेमध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दोघांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. तेथे उपचार सुरू असताना वृंदा संगवार यांचा मृत्यू झाला.
संगवार यांच्या देवघरात दिवा लावला होता. वाऱ्यामुळे पडदा हलून ज्योतीला लागल्याने पडद्याने पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण घरातील साहित्य पेटत गेले. त्याची झळ फ्रिजला लागल्याने त्याच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यामुळे घरातील इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जळाले. या आगीतून बाहेर पडता न आल्याने संगवार व बोरकर गंभीररीत्या भाजले, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दिली. अग्निशामक दलाच्या चार पथकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे आजूबाजूच्या घरांमधील रहिवासी बचावले.


