पुणे: प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, अनेक विभागात रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्याने उशीर होत आहे. पुण्यात येणाऱ्या हजरत निझामुद्दीन, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-सांत्रागाची आणि दानापूर या महत्वाच्या रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे शहरातून दिल्ली, पाटणा, कोलकत्ता, इंदौर, जबलपूर आणि कन्याकुमारी व इतर भागात महत्वाच्या रेल्वे गाड्या धावतात. काही वेळा गाड्यांना सिग्नल न मिळाल्याने गाडयांना थांबवावे लागते. यामुळे पुढील स्थानकावर पोहचण्यासाठी उशीर होतो. सर्व गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. तसेच उत्तर भारतातील बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीचे काम सुरु आहे. शिवाय इतरही विभागात तिसऱ्या आणि चौथ्या लाइनेचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेगावर परिणाम होत आहे. प्रवाशांना रेल्वेमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. मुख्य स्थानकातून गाडी वेळेवर निघूनसुद्धा मार्गावर काम सुरू असल्यामुळे रेल्वे गाड्यांना पुढे सिग्नल मिळत नाही. पुढील मार्गावर सिग्नल न मिळाल्याने गाड्यांना उशीर होत आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
झेलम, हावडा, आझाद हिंद आणि दानापूर या उत्तर भारताकडे धावणाऱ्या प्रमुख गाड्या आहेत. परंतु, बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे. तसेच खांडवा विभागात नव्या रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या गाड्यांना सातत्याने उशीर होत आहे. या सर्व प्रमुख गाड्यांना पुण्यात पोहोचायला रविवारी दोन ते सात तासांपर्यंत उशीर झाला आहे.


