पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात हुंड्याच्या छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील W-57 सोसायटीत राहत्या घरात एका विवाहितेचा गळफास लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दिव्या हर्षल सूर्यवंशी असं 26 वर्षीय महिलेचे नाव आहे.
दरम्यान, ही आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दिव्याचा पती हर्षल शांताराम सूर्यवंशी आणि सासरच्या कुटुंबीयांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही या परिसरात वैष्णवी नावाच्या तरुणीचा हुंड्याच्या छळामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती, आणि आता पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे.
दिव्याच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने हुंड्यासाठी छळले जात होते. पती हर्षल आणि सासरच्या कुटुंबीयांकडून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. माहेरच्यांचा दावा आहे की, या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली नसून, तिचा खून करण्यात आला आहे. त्यांनी पती आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा थेट आरोप केला आहे.
वाकड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टम अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, हर्षल सूर्यवंशी आणि सासरच्या इतर सदस्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींचे जबाब नोंदवले असून, परिसरातील साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दिव्याच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवड परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वैष्णवीच्या घटनेनंतर अवघ्या काही काळातच पुन्हा एका तरुणीचा हुंड्यामुळे बळी गेल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी हुंडा प्रथेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि जनजागृतीची गरज व्यक्त केली आहे. स्थानिकांनी पोलिसांना तपासात पारदर्शकता ठेवण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.


