Sahyadri Hospital: पुण्यातील हडपसर परिसरातील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडाला. शिवसेनेच्या (शिंदे गट) वैद्यकीय कक्षाचे शहरप्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर संतापाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात तोडफोड झाल्याची घटना घडली. सपकाळ यांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप करत, “मी वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने माझ्या वडिलांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले,” असा दावा केला. सपकाळ यांनी सांगितले की, 28 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वडिलांवर अल्सरचं ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टरांनी दोन दिवसांत प्रकृती सुधारेल, अशी माहिती कुटुंबाला दिली होती. ऑपरेशननंतर रुग्ण शुद्धीवरही आले, कुटुंबीयांशी बोलले. त्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले. मात्र, त्यानंतरच संशय वाढवणारी घटना घडल्याचं सपकाळ म्हणाले.
चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू?
त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशननंतर केवळ दोन दिवसांत रुग्णाला खुर्चीवर बसवण्यात आलं आणि या हालचालीदरम्यान घेतलेल्या टाक्यांपैकी सहा-सात टाके तुटले. “इतक्या मोठ्या त्रुटीबद्दल डॉक्टरांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. फक्त शरीरात इन्फेक्शन झाल्याचं सांगत वेळ काढला,” असा आरोप सपकाळ यांनी केला. याशिवाय अल्सरच्या शस्त्रक्रियेनंतर अचानक फुफ्फुसात पाणी आढळल्याची बाबही त्यांना उशिरापर्यंत सांगण्यात आली नव्हती, असेही ते म्हणाले. “चुकीच्या उपचारांमुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला,” असा त्यांचा ठाम आरोप आहे.
वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात झालेल्या तोडफोडीबद्दल विचारले असता सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली, “तोडफोड कोणी केली हे आम्हाला माहीत नाही. पण या रुग्णालयात सर्वसामान्यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. इन्शुरन्सचे पैसे काढून लोकांना देण्याचा प्रकार इथे सातत्याने चालतो.” ते पुढे म्हणाले, “जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच बसणार आहोत. मी शिंदे गटाचा शहर प्रमुख असूनही माझ्या कुटुंबावर अशी वेळ आली, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल?” या प्रकरणामुळे सह्याद्री हॉस्पिटलवरील तक्रारी आणि उपचारातील पारदर्शकतेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


