पुणे : पुणे शहरात स्विमींग पूलमध्ये पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धायरी परिसरातील पार्क व्हिव सोसायटीमध्ये काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे. सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना एका ६ वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
निनाद गोसावी (वय ६ वर्ष) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी (दि. ११) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. निनाद हा सोसायटीच्या आतमध्ये खेळत होता. परंतु, खूप वेळ झाल्यानंतर तो घरी परतला नसल्यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. त्यानंतर तब्बल दोन तासांनी निनाद हा स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.


