पुणे: शहरातील ढोले पाटील रोडवरील हॉटेलच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान काँक्रीटचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार, नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब अचानक खाली पडला.
दरम्यान, मोठा आवाज ऐकून आणि अडकलेल्या कामगारांना पाहून जवळच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली. पुणे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी विलंब न करता बचाव कार्य सुरू केले. ढिगारा काळजीपूर्वक काढल्यावर दोन्ही कामगार गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा – Pune Petrol Pump : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; काय आहे कारण?
जखमी कामगारांवर वैद्यकीय उपचार सुरू
अग्निशमन दलाने जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुण्यातील नूतनीकरण आणि बांधकाम स्थळांवरील सुरक्षा प्रोटोकॉल पुन्हा चर्चेत आले आहेत. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी सुरू केली असून या कामादरम्यान सर्व नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची चौकशी करण्यात येणार आहे.


