Maharashtra Weather Updates : मार्च संपत असताना राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असला तरी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता असून गारपीट, वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसासह गारपीट झाली होती. आता पुन्हा पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीला बसण्याची शक्यता असून आंब्याच्या पिकावरही संकट ओढवू शकतं.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड वारे आणि समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा मिलाफ झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर दिसून येणार आहे. जेट स्ट्रीममुळे वरच्या स्तरात थंड वारे वेगाने वाहत असून त्यामुळे वातावरण अस्थिर बनले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत गारपीट व जोरदार पावसाचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी तसेच नागरिकांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


