Pimpri-Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे जीवितहानीची घटना घडली आहे. जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या मागील चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सुमारे सव्वाएकच्या सुमारास घडलेल्या या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मृत तरुणीची ओळख तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. मुक्तानंद हाइट्स, हिंजवडी–डांगे चौक रोड) अशी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी आपल्या वडिलांसोबत दुचाकीने (एमएच १४ – 3883) जांबे परिसरातून प्रवास करत होती. सावंत पार्क चौकाजवळ पोहोचताच अचानक आलेल्या डंपरने (एमएच १४ HU 9855) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की तन्वी थेट वाहनाच्या चाकाखाली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.
हेही वाचा – Navale Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात; 4 ते 5 वाहनांची जोरदार धडक
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंजवडी आणि परिसरात डंपरमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरू असून अनेक निरपराध नागरिकांचे जीव जात आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नागरिकांनी निषेध मोर्चा देखील काढला होता. तथापि, वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची नाराजी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चालकाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.


