Beed Accident: बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात आज सकाळी एक गंभीर अपघात घडला. धुळे–सोलापूर महामार्गावरून जात असताना डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाला आणि काही क्षणांतच मोठा स्फोट होऊन संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्फोटानंतर टँकरमधील डिझेल रस्त्यावर पसरल्याने आगीने भयंकर रूप धारण केले. रस्त्याच्या एका बाजूने तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत ज्वाळांचे लोट उसळत असल्याचे भयावह दृश्य समोर आले. घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टँकर पलटी, स्फोट आणि ज्वाळांचा प्रचंड भडका
प्राथमिक माहितीनुसार, घाटातील अवघड वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. उताराचा रस्ता असल्याने पलटी झालेला टँकर काही अंतरापर्यंत घसरत राहिला, ज्यामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले. थोड्याच वेळात अचानक मोठा स्फोट झाला आणि आग वेगाने पसरली. काही क्षणात महामार्गावर दाट धूर पसरला आणि ज्वाळांनी परिसराला वेढा घातला. या भीषण घटनेदरम्यान टँकरचा चालक आणि क्लिनर यांना स्थानिक नागरिकांनी तत्परतेने बाहेर काढले. त्यामुळे दोघांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.
हेही वाचा – Pune: सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; एसटीच्या धडकेत 20 विद्यार्थी, 5 शिक्षक जखमी
पाठीमागील वाहनांचा अपघात, पोलिस व स्थानिकांचा मदतीसाठी धाव
टँकर उलटल्यानंतर अचानक उभ्या राहिलेल्या परिस्थितीत पाठीमागून येणाऱ्या काही वाहनांची एकमेकांवर धडक झाल्याची माहिती मिळाली आहे. स्फोटानंतर परिसरात घबराट पसरली. तसेच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा –Pune Porsche Accident: पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई! 2 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ
वाहतूक कोंडीचा भीषण सामना
अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा तयार झाल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत वाहने अडकून राहिल्याने महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.


