Shrikant Shinde: अंबरनाथ नगर परिषदेच्या राजकारणात झालेल्या एका धक्कादायक भूकंपाने राज्याच्या महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपने अंबरनाथमध्ये थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केली. शिंदे गटाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी झालेल्या या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेने (शिंदे गट) यावर अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भाजप-काँग्रेसच्या ‘अजब’ युतीने गाठले बहुमत
अंबरनाथ नगर परिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी महापौरपद जिंकले आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 4 अशा एकूण 32 नगरसेवकांच्या पाठबळावर भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध केले. यामुळे शिवसेनेच्या 27 नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत, ही युती म्हणजे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असा गंभीर आरोप केला.
खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाजपला चॅलेंज
एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणावर सावध पण टोकदार प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, अंबरनाथमधील ही युती आमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठी एक मोठा प्रश्न आहे आणि याचे उत्तर भाजपचे नेतेच अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतील. अनेक वर्षांपासूनची भाजप-शिवसेना युती केंद्र आणि राज्य पातळीवर अखंड राहिली पाहिजे, ही आमची भावना आहे. आम्ही अंबरनाथमध्ये उत्तम विकासकामे केली आहेत, आता भाजप जो काही निर्णय घेईल त्यावर शिवसेना आपल्या भूमिकेनुसार विकासाचे राजकारण करेल.
या वादात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी सांगितले की, आम्ही भाजपला एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी पलटवार करताना म्हटले की, गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचारात गुंतलेल्यांसोबत राहणे ही खरी अयोग्य युती ठरली असती. आम्ही चर्चेसाठी प्रयत्न केले, पण शिंदे गटाने दाद दिली नाही.


