बार्शी (सोलापूर): शेळ्या चोरीच्या गुन्ह्यांत नाव का घातले या कारणावरुन संशयित आरोपी आनंद शिंदे याच्यासह नात्यामधील सहा महिलांनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिस ठाण्यात तुफान राडा घातला. यावेळी आनंद शिंदे याने पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना संबंधित गाडीत न बसता गाडीच्या चाकांखाली पडून जीव देण्याचा प्रयत्नदेखील त्याने केला. यादरम्यान शिंदे याच्यासोबतच्या सहा महिलांनी पोलिस ठाण्याच्या आवारात राडा घालत उपस्थित पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या अंगावर धाऊन जात त्यांच्यावर अटॅक करीत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळदेखील केली. ‘खाकी ‘वर्दीवर हात उचलले. यातून पोलिस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी आकाश पवार यांनी फिर्याद दिली. त्यावरुन संशयित आरोपी आनंद शिंदे याच्यासह अंजना शिंदे, प्रिया काळे, संगिता पवार, सुनीता शिंदे, राणी शिंदे आणि कीर्ती काळे (सर्व रा. दोराळे, ता. बार्शी) यांच्याविरुद शासकीय कामात अडवळा आणणे, शांतता भंग करणे वासह विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदले आहेत. या घटनेसंदर्भात प्राप्त माहिती अशी, दोन शेळ्या आणि दोन पिल्लं चोरीला गेली होती. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार, पोलिसांनी तपास केला असता संशयित आनंद शिंदे याने त्या शेळ्या आणि पिल्लं चोरल्याचं तपासातून निष्पन्न झालं होतं. शिंदे याने पिल्लांसह त्या शेळ्या वैरागपासून जवळच असलेल्या वावली शिवारात नेऊन ठेवल्या होत्या.
शुक्रवारी फिर्यादीस घेऊन वैराग पोलीस ठाण्याचे कर्मचारी वावली शिवारात शेळ्या आणण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांनी शेळ्या ताब्यात घेतल्या आणि संशयित आरोपी आनंद शिंदे याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सापडला नाही. यावेळी येथे उपस्थित असलेल्या महिलांनी आनंद शिंदे याला तुम्ही शेळ्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवणार असाल, तर आम्ही उद्या वैराग पोलिस ठाण्यात येऊन काय करतो ते बघा अशी धमकी पोलिसांना दिली होती.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी आनंद शिंदे याच्यासह सहा महिला वैराग पोलिस ठाण्यात आल्या आणि त्यांनी येथील पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालत तुफान राडा केला.
पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन
संशयित आरोपी आनंद शिंदे याने आपल्या खिशातील बाटली काढून त्यामधील विष पोलिस ठाण्यात आवारातच घेतले. याप्रकाराने आणखीनच खळबळ माजली. उपस्थित अधिकारी तसेच कर्मचारीदेखील या प्रकाराने हादरून गेले
संशयित आरोपीसह पत्नी पडली गाडीखाली आडवी
विष प्राशन केलेल्या आनंद शिंदे याला गाडीत बसवून शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात येत होते. त्यासाठी त्याला गाडीत घालण्याचा प्रयत्न पोलिस करीत होते, त्यावेळी आणि आनंद शिंदे आणि त्याची पत्नी अंजना शिंदे गाडीच्या खाली आडवे पडले. त्यांनी गाडी रोखली. यादरम्यान पोलिसदेखील चक्रावले.


