पेशावर : पाकिस्तानच्या आदिवासीबहुल खैबर पख्तून्ख्वों प्रांतात शनिवारी सकाळी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६ सैनिक मरण पावले असून ८ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खैबरमधील दक्षिण वजिरिस्तान जिल्ह्यात लिता सार तपास नाक्याजवळील चौकीला अतिरेक्यांनी निशाणा बनवले आहे. अलीकडच्या काळात सुरक्षा दलांवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे.
यामध्ये १६ सैनिकांना प्राण गमवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पाकच्या लष्करी जवानांनी सारारोघा जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना ठार मारले. अफगाण सीमेलगतच्या भागातून दहशतवादाचा सफाया करण्याचे अभियान सध्या राबवले जात आहे. अशातच दक्षिण वजिरिस्तानात दहशतवादी हल्ला झाला आहे.


