बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू स्थित ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’ मध्ये (एनएलएसआययू) तृतीयपंथीयांना ०.५ टक्के अंतरिम आरक्षण देण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने शनिवारी दिले आहेत. विद्यापीठ प्रवेशसंबंधी धोरण बनवेपर्यंत तृतीयपंथीयांना शुल्क भरण्यात सूट देण्याचे न्या. रवि व्ही. होस्मानी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बजावले आहे.
मुगील अंबू वसंता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तृतीयपंथीयांना ‘एनएलएसआययू’ मध्ये आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच रोजगारात १ टक्का आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही न्यायाधीशांनी विचार केला आहे. दरम्यान, ‘एनएलएसआययू’मध्ये ०.५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्देशांचे तृतीयपंथीयांनी स्वागत केले आहे.


