Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या क्रॅन्स-मोंटाना येथे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा उत्साह शोकात बदलावा अशी धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका प्रसिद्ध बारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे काळाचा घाला
व्हॅलेस कॅन्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रॅन्स-मोंटाना येथील ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) बारमध्ये गुरुवारी पहाटे १:३० च्या सुमारास एक किंवा अधिक स्फोट झाले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या बारमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. स्फोटानंतर काही वेळातच बारला भीषण आग लागली, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली.
बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात
घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी अनेक रुग्णवाहिकांसह ‘एअर-ग्लेशियर्स’ (Air-Glaciers) हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
पोलीस प्रवक्त्यांचे अधिकृत निवेदन
पोलीस प्रवक्ते गेटन लाथियन यांनी एएफपीला (AFP) माहिती दिली की, स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत अनेक जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून अनेक पर्यटक गंभीर जखमी आहेत. फॉरेन्सिक पथके घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
An explosion followed by a fire ripped through a bar in the Swiss resort town of Crans-Montana, killing several people and leaving others critically injured, police said. pic.twitter.com/XjH7NkjPkS
— Open Source Intel (@Osint613) January 1, 2026
मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर
पीडितांच्या कुटुंबियांना माहिती देण्यासाठी पोलिसांनी अधिकृत हेल्पलाइन क्रमांक ०८४८ ११२ ११७ जारी केला आहे. या घटनेबाबत अधिक माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये शोककळा पसरली असून सुरक्षा यंत्रणांकडून तपास वेगाने सुरू आहे.


