Sugar Rate: केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखर कोटा 24 लाख टन इतका जाहीर केला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा कोटा 1.25 लाख टनांनी कमी आहे. यामुळे खुल्या बाजारात साखरेची उपलब्धता कमी होणार असून दिवाळीपूर्वी दरवाढीची शक्यता अधिक आहे. सरकार दर महिन्याला देशातील साखरेची शिल्लक, हंगामातील उत्पादन आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन कोटा जाहीर करते.
सप्टेंबर महिन्यात 23.5 लाख टन साखरेचा कोटा खुला करण्यात आला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या काळात मागणी वाढणार असूनही कोटा कमी ठेवल्याने व्यापारी व ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असून मिठाई, फराळ आणि इतर गोड पदार्थांच्या खरेदी-विक्रीला या दिवसांत मोठी चालना मिळते.
हेही वाचा – Laxman Hake Car Attack: लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाकडून हल्ला; पाथर्डी तालुक्यातील आरनगावात घडली घटना
दरम्यान, साखर कोटा कमी ठेवल्याने बाजारात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दरवाढ होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या देशात अंदाजे 45 लाख टन साखर शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कारखान्यांकडे उपलब्ध साठा कमी आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोटा कमी असल्यामुळे बाजारात पुरवठा मर्यादित होईल आणि ग्राहकांना जास्त दर द्यावे लागतील. सध्या घाऊक बाजारात साखरेचा दर प्रति क्विंटल 3900 रुपये आहे, ज्यावर 5 टक्के जीएसटी लागू आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची साखर साधारणतः 45 रुपयांमध्ये मिळते, मात्र दिवाळी जवळ येताच हा दर 50 ते 100 रुपये अधिक वाढण्याची शक्यता आहे. सरकारने काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन कोट्यात बदल केला नाही, तर दिवाळीपूर्वी ग्राहकांना महागडी साखर खरेदी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.


