Indapur Municipal Council Election: इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचलेली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे माजी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भारतीय जनता पार्टी चे नेते प्रवीण माने या तिघांमध्ये आघाडी होऊन कृष्णा-भिमा विकास आघाडी तयार झाली असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्या विरोधात शड्डू ठोकलेला दिसतो. नगरपरिषद निवडणूक जाहिर होण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरदचंद्र पवार पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली होती. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या परंतु सक्षम कार्यकर्ता चा वानवा त्यांना दिसून आला होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला अजित पवार पक्षाचे तत्कालीन पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली होती, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पॅनल बनविण्याची पूर्णतः तय्यारी केली होती.
दरम्यान च्या काळात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरतशेठ शहा यांच्या नावाला दुजोरा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली.भरणे यांच्या या भूमिकेमुळे गारटकर व एकूणच पक्षामध्ये वादाची ठिणगी पडली. शहा यांना पक्षप्रवेश द्यायचा की नाही या विषयावर खलबत्ते सुरु झाली; संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चा रंगू लागली. गारटकर आणि भरणे यांच्यातील वाद जनतेसमोर आला निवडणुक जाहिर झाल्यानंतर गारटकरांनी पक्षाच्या विरोधात बंड करत जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्ष सदस्याचा राजीनामा दिला. या घटनाक्रमाच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती.
हेही वाचा – इंदापूरचा चेहरा मोहरा बदल्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही; दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा
दरम्यान, 2017 च्या नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्या निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ.माधुरी मिसाळ आदी दिग्गज नेते मंडळींनी प्रचार सभा घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांचे या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल करण्याचे मनोबल शिगेला पोहचले होते परंतु माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा नेते प्रवीण माने यांच्यामध्यें आघाडी ची चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील घडामोडी पाहता हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीप गारटकर यांनी आघाडीचे निमंत्रण दिले. त्यानुसार अखेर कृष्णा-भिमा विकास आघाडी निर्माण झाली.
हेही वाचा – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णा-भिमा आघाडीत लढत
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामधील एक नाट्यपर्व संपले आणि भरत शहा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पक्षप्रवेश केला. सध्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणकंदन सुरु आहे. हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, मोहोळचे माजी आ. यशवंत माने हे चौघेजण प्रचार सभेमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पैसेवाल्याला उमेदवारी देण्यासाठी घाट घातला असा आरोप करत आहेत. विकास कामे व त्याचा निधी या सगळ्यांवर साशंकता व्यक्त केली जात आहे. आरोपाच्या फेरी प्रचारसभेत उडत असताना सर्वसामान्य मतदारांचे मुलभूत प्रश्नांवर काहीही बोलले जात नाही, तर दुसऱ्या बाजूला आरोपाचे खंडन करण्यासाठी कृषीमंत्री भरणे मागील पंचवार्षिक योजनेमध्ये इंदापूर शहरासाठी 867 कोटी रुपयांचा लेखाजोखा मांडत आहेत. इंदापूर शहरातील शहांचा चाहता मतदार सर्व शक्ती पाठीशी उभा करत आहे तर आघाडी चे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या कार्यपद्धती ज्ञात असलेले समर्थक, उमेदवार प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रदीप गारटकर मतदारांच्या मनामध्ये नवीन विकासाची दिशा कशी असेल याची साखरपेरणी करत आहेत.
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आघाडीचे सूत्र फलद्रूप होईल का? याचे उत्तर इंदापूर शहर सुजान नागरीक मताची बजावणी करताना उत्तर देतील की, कृषीमंत्री मंत्र्यांच्या विकास कामांच्या जोरावर मतदान करतील अशी आजमितीस स्पष्टपणे दिसत आहे. प्रचार सभेमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा अघोषित वल्गना होत आहेत. परंतु माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाईचे सर्वेसर्वा प्रवीण माने आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर हे तिघेही धनसंपन्न आहेत तसेच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा हे दोघेही पिढीजात धनाढ्य असे आहेत यामुळे धन शक्ती विरुद्ध जनशक्ती ही वल्गना फोल ठरत आहे.
आजी-माजी मंत्री दोन्ही पॅनल चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरी यामध्ये तथ्य दिसत नाही. केवळ हा संघर्ष सत्ता कारणासाठी पेटलेला दिसत आहे. ही निवडणुक रंगतदार होत असून दररोज एक नवीन विषय मतदारांच्या पुढे येत असून खरपूस, खुसखुशीत आस्वाद घेत नागरिक चौका- चौकांत, चहाच्या टपरीवर चव घेत आहे. कोणाच्या बाजूने निवडणुकीचा कौल लागेल हे पाहण्यासाठी निकालाची वाट पाहवी लागणार आहे.


