Thane Municipal Corporation Election: राज्यातील महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर सत्ताधारी महायुतीत अंतर्गत ताणतणाव स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एका महत्त्वाच्या महापालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांचा ‘एकला चलो’चा नारा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून, या ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेसाठीही अजित पवार गटाने वेगळा मार्ग स्वीकारल्याने महायुतीतील एकजूट केवळ घोषणापुरतीच मर्यादित असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा – महापालिका रणधुमाळीला सुरुवात! प्रचारासाठी फक्त 12 दिवस; प्रत्येक दिवस ठरणार निर्णायक
ठाण्यात महायुतीत तिढा
भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र ठाणे महापालिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी वेगळी भूमिका घेत स्वबळाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ठाण्यात महायुतीत तिढा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. आम्ही महायुतीचा भाग असलो तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटासोबत युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निदर्शनास आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची सातत्याने मागणी होत होती. तसेच मुंब्रा आणि परिसरातील मुस्लीमबहुल भागांतील स्थानिक राजकीय गणिते लक्षात घेता स्वतंत्र रणनिती अधिक फायदेशीर ठरेल, असा पक्षाचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे ठाणे महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीमुळे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरही मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


