पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना गृहीत धरून चार सदस्यीय प्रभाग तयार केले जाणार आहेत. त्यामुळे पुण्यात नगरसेवकांची संख्या ही १६६ इतकी राहणार आहे. तर ४२ प्रभाग असणार आहेत. हे सर्व काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेवटचा शासनाचा निर्णय तपासण्यात आला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अप्पर आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात याव्यात, असे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे पालिकेच्या वतीने तीन सदस्य पध्दतीने रचना तयार करण्यात आली होती. या प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली होती. मात्र राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून तीनच्या प्रभाग रचनेला स्थागिती देण्यात आली होती. जनगणना न झाल्याने २०११ ची मतदारयादी ही ग्राह्य धरण्यात यावी यासाठी महायुतीचे सरकार आग्रही होते.
मंगळवारी उच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पुणे पालिकेची निवडणूक २०१७ साली झाली होती. या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा वापर करण्यात आला होता. तर २०११ ची लोकसंख्या आणि मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली होती. आज रोजी तरी पुणे पालिकेच्या निवडणूक प्रशासनाची चार सदस्यीय प्रभाग रचनेची तयार पूर्ण झाली आहे
पावसाळयात निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याचे नमूद करताना पाटील म्हणाले, राज्य सरकाच्या आदेशानुसार पालिका निवडणुकीसाठीची सर्व तयारी ही निवडणूक विभागाची पूर्ण झालेली आहे. याबाबत अंतिम टप्पात काम सुरू आहे. निवडणूक विभागाचे कामकाज हे कायमच सुरू असते. राज्य सरकार आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आमचे काम होणार आहे.
पुणे पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला ९८ जागा मिळाल्या होत्या. तर अखंड शिवसेनेचे १०, तर काँग्रेसचे १० नगरसेवक होते. तर अखंड राष्ट्रवादीचे ४४ नगरसेवक कार्यरत होते. मधल्या काळात शिवसेनेचे विभाजन झाले असून विधानसभा निवडणुकीनंतर पाच नगरसेवक हे भाजपमध्ये गेले आहे. तर राष्ट्रवादीचे विभाजन होऊन श.प. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार रा. कॉंग्रेस असे विभाजन झाले आहे.


