अकोला: लग्न करून सुखी संसार करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. मात्र काहींचं नशिब इतकं कठीण ठरतं की वय वाढतं, पण विवाह जमत नाही. अशाच एका अकोल्यातील तरुणाने स्वतःच्या वैवाहिक अडचणीसाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची मदत मागितली आहे. या तरुणाने पवार साहेबांना एक भावनिक पत्र लिहून ‘मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, कृपया माझी मदत करा,’ अशी थेट विनंती केली आहे. हे अनोखं पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.
शरद पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या ग्रामीण भागातील हा तरुण शेतकरी कुटुंबातील असून त्याने पवार साहेबांच्या अकोला दौऱ्यादरम्यान हे पत्र प्रत्यक्ष दिलं. पत्रात त्याने म्हटलं आहे की, “मी शेतकरी वर्गातील आहे, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे कुणीही आपली मुलगी देत नाही. माझं वय 34 वर्षं झालं आहे, पण अजून लग्न होत नाही. कृपया माझ्या संसारासाठी जोडीदार मिळवून द्या.”
त्याने पुढे म्हटलं आहे की, “मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे. तिच्या माहेरी जाऊन राहायलाही हरकत नाही. मी तिथे प्रामाणिकपणे काम करेन आणि चांगला संसार उभा करेन.” या पत्राच्या शेवटी त्या तरुणाने लिहिलं, “माझ्या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.”
हेही वाचा – निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा! ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले
शरद पवारांकडून प्रतिसाद
या घटनेची माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की, पवार साहेबांनी पक्षाच्या बैठकीत हे पत्र वाचून घेतले आणि जयंत पाटील यांना त्या तरुणाच्या लग्नासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या. अनिल देशमुख म्हणाले, “अकोल्यातील त्या तरुणाने दिलेलं पत्र साहेबांनी गांभीर्याने घेतलं. बैठकीतच जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगितलं आणि त्या तरुणासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले. आता विदर्भातील आमचे कार्यकर्ते या तरुणासाठी योग्य जोडीदार शोधण्याचे प्रयत्न करत आहेत.”
हेही वाचा – बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ
सोशल मीडियावर जोरदार चर्चा
या भावनिक पत्रामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काहींनी या तरुणाच्या प्रामाणिक विनंतीचं कौतुक केलं, तर काहींनी या तरुणाच्या पत्राला मजेशीर असं म्हटलं आहे. मात्र, या प्रसंगाने ग्रामीण भागातील विवाहातील सामाजिक आणि आर्थिक अडचणींचं वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं आहे.


