सोलापूर: बार्शीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार दिलीप सोपल हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला कारणदेखील तसेच आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या वर्धापन सोहळ्याबरोबरच खासदार आणि आमदारांसाठी खास आयोजित स्नेहभोजनाकडे आमदार सोपल यांनी पाठ फिरवली. त्यामुळे त्यांच्याबद्दल बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात तर्क-वितर्क अन् अंदाज अपना अपनाच्या वावड्या उठल्या आहेत. सोपल हे स्वः गृही म्हणजे ठाकरे शिवसेनेत नाराज आहेत की, पक्षांतराच्या वाटेवर आहेते, असा अंदाज वर्तवत त्यांच्याबद्दल चर्चा सुरु आहे.
विशेषत्वे, आमदार सोंपल आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मागच्या अनेक वर्षांपासूनचे स्नेहसंबंध आहेत. शरद पवार हे वर्षभरापूर्वीच सोपल यांच्या घरी येऊन गेले, त्याचादेखील संदर्भ लावून त्यांच्या पक्षांतराबद्दल वावड्या उठत आहेत. सोपल यांच्या तटस्थ भूमिकेची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला चिंता आहे तर सोपल यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात यावं यासाठी सकारात्मक वातावरण आहे, त्यांच्या ‘दिलसे’ स्वागतासाठी हा गट सज्ज असल्याचीही चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आमदार आणि खासदार हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. तसेच, ऑपरेशन टायगरची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती.
त्या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री दिलीप सोपल यांची मुख्य कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिंता वाढविणारे ठरण्याची शक्यता आहे. माजी मंत्री दिलीप सोपल हे बार्शी मतदारसंघातून पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर निवडून आलेले आहेत. यापूर्वीही सोपल यांनी शिवसेनेसोबत घरोबा केला होता. मात्र त्यांची मैत्री शिवसेनेसोबत जास्त काळ टिकू शकलेले नव्हती. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
मुळात दिलीप सोपल हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर सोपल हे शरद पवारांसोबत गेले होते. वर्षभरापूर्वी शरद पवार हे बार्शीच्या दौऱ्यावर आले होते, त्या वेळी त्यांनी सोपलांच्या घरी जाऊन दिलीप सोपल यांची भेट घेतली होती.
आमदार सोपलांची दांडी अन् खूप काही…
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर, एखाद्या आमदाराची वर्धापनदिनासारख्या कार्यक्रमाला हजेरी नसणे बरेच काही सांगून जाणारे आहे. वर्धापनदिनाबरोबरच पक्षाने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनालाही सोपल यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.


