Jahanara Alam: बांगलादेशच्या वेगवान महिला गोलंदाज जहांआरा आलम हिने एका माजी क्रिकेटपटूवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला असून, तिच्या खुलाशामुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून काही काळ ब्रेक घेतलेल्या जहांआराने दावा केला की, 2022 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान तिला संघ व्यवस्थापनाकडून “अश्लील सल्ला” देण्यात आला होता. क्रिकबझच्या माहितीनुसार, माजी पुरुष वेगवान गोलंदाज मंजुरुल इस्लाम, जे त्या वेळी महिला निवड समितीचे सदस्य आणि टीम मॅनेजर होते.
अनेक वेळा सहन करावं लागलं…
रियासत अझीम यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना जहांआरा म्हणाली, मला एकदा नाही, तर अनेक वेळा अश्लील सल्ला सहन करावा लागला. संघाशी संबंधित असताना अनेक गोष्टी आपण बोलू शकत नाही. करिअर आणि इमेजचा प्रश्न असतो, त्यामुळे विरोध करणेही कठीण होते. जहांआराने दिवंगत तौहिद महमूद आणि माजी निवड समिती प्रमुख नदीम चौधरी यांच्यावरही गंभीर आरोप केले. तिच्या मते, बीसीबीचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांनी तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले.
जहांआराने आणखी धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, न्यूझीलंडमध्ये आमच्या प्री-कॅम्प दरम्यान तो (मंजुरुल) माझ्या खांद्यावर हात ठेवत असे, जवळ ओढत असे, आणि कानात बोलत असे. एकदा तर त्याने विचारलं, ‘तुमच्या मासिक पाळीला किती दिवस झाले आहेत?’ जहांआराने स्पष्ट केले की ती या सर्व गोष्टी उघड करत आहे जेणेकरून इतर मुलींना अशा परिस्थितीत स्वतःचे रक्षण करता येईल.
मंजुरुल आणि बीसीबीची प्रतिक्रिया
दरम्यान, मंजुरुल इस्लाम यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. ती एका मृत व्यक्तीचं नावही घेत आहे, जे अत्यंत दुर्दैवी आहे. जर आरोप खरे असतील, तर पुरावे सादर करावेत, असं मंजुरुल इस्लाम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बीसीबी उपाध्यक्ष शखावत हुसेन यांनी सांगितले की, हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा सखोल विचार करू आणि आवश्यक असल्यास चौकशी सुरू केली जाईल.


